Home प्रशासन फेकरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी योजनेवर प्रश्नचिन्ह ; १० बाय ५ फुटांच्या...

फेकरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी योजनेवर प्रश्नचिन्ह ; १० बाय ५ फुटांच्या केंद्रामुळे योजनेच्या उद्देशाची थट्टा?

0
7

फेकरी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास कार्यक्रमांतर्गत (दलित वस्ती सुधार योजना) उभारण्यात येणाऱ्या लायब्ररी व अभ्यासिका केंद्रांचा उद्देश वंचित घटकातील विद्यार्थी, युवक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ज्ञानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, भुसावळ तालुक्यातील फेकरी ग्रामपंचायतीने उभारलेल्या सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राच्या सद्यस्थितीवर स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, ही योजना विकासाचा आदर्श ठरणार की केवळ औपचारिकता राहणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास कार्यक्रमातून उभारण्यात येणाऱ्या या केंद्रांचा संबंध थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांशी जोडला जातो. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश आजही समाजाला शिक्षण, ज्ञान आणि सामाजिक परिवर्तनाचा मार्ग दाखवतो. मात्र, फेकरी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्राच्या आकारमानाबाबत आणि उपयुक्ततेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केवळ १० फुट बाय ५ फुटांच्या इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या या केंद्रातून विद्यार्थी, वाचक आणि स्पर्धा परीक्षार्थींना अपेक्षित सुविधा मिळणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासकीय निधीतून उभारण्यात आलेल्या अशा प्रकल्पांचा दर्जा, उपयोगिता आणि पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. अन्यथा योजना केवळ कागदावर पूर्ण झाल्याचे दाखवून शासकीय निधीचा अपव्यय होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाही यामुळे धक्का पोहोचत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या केंद्राच्या अवस्थेवर नागरिकांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत, “या लायब्ररीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये व्हावी आणि अशा अजब-गजब उपक्रमासाठी संबंधितांना पुरस्कार मिळावा,” असा टोला लगावला आहे. या वक्तव्यामागील उद्देश संबंधित प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी, हा असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद; समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती भुसावळ यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी आणि योजनेचा मूळ उद्देश साध्य करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण, वाचन आणि सामाजिक प्रबोधनासाठी उभारण्यात येणारी लायब्ररी व अभ्यासिका केंद्रे ही केवळ इमारती न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ज्ञानकेंद्रे बनणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायतीने जबाबदारीने काम करून या योजनांना खऱ्या अर्थाने यशस्वी करणे आवश्यक असल्याचे मत प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ता व समुपदेशक तथा सेवानिवृत्त वर्ग-१ अधिकारी विठ्ठल तायडे यांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound