रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ रावेर तहसील कार्यालयासमोर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केली.
रावेर तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कथित कारवाईचा निषेध व्यक्त करत, लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

या धरणे आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, सेवादलाचे प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, शिवसेना संघटक अशोक शिंदे, आंदोलनाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिंधू पाटील, प्रदीप सपकाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रमोद कोंडे, कामगार नेते दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ. सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक सफदर पहलवान, विनायक महाजन, रामदास लहासे, ज्ञानेश्वर पाटील, काँग्रेसचे सुनिल कोंडे, संतोष पाटील, यशवंत धनके, काँग्रेस शहराध्यक्ष धुमा तायडे, शेख सलीम, इस्माईल पहलवान, आर. के. चौधरी, ॲड. जिजाबराव पाटील, ॲड. दिपक तायडे, प्रतापसिंग राठोड, युवासेना तालुकाध्यक्ष किरण पाटील तसेच शहरप्रमुख निलेश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले.



