Home Cities चोपडा अडावदमध्ये प्रशासन नागरिकांच्या दारी; महसूल समाधान शिबिरात योजनांचा लाभ, तक्रारींचा तात्काळ निपटारा

अडावदमध्ये प्रशासन नागरिकांच्या दारी; महसूल समाधान शिबिरात योजनांचा लाभ, तक्रारींचा तात्काळ निपटारा

0
7

अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाला’ अडावद येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चोपडा तालुक्यातील अडावद मंडळातील नऊ गावांसाठी आयोजित या सर्वसमावेशक शिबिरात तब्बल २ हजार ते २३०० नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला, तर घरकुल, रेशन, निराधार योजना आणि इतर शासकीय सेवांबाबत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. विशेष म्हणजे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा केल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

अडावद येथील क्षत्रिय माळी समाज मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे एकत्रित सेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत विविध योजनांचे प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि आर्थिक सहाय्याचे धनादेश लाभार्थ्यांना वितरित केले.

शिबिराच्या प्रारंभी सकाळी दहा वाजता आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि शामराव येसो महाजन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाच्या शानदार स्वागताने आगमन झाले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज तसेच अजितदादा पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, भूमिअभिलेख, वन, पशुसंवर्धन, परिवहन, सिंचन, महिला व बालविकास, घरकुल, रोजगार हमी, शिक्षण यांसह विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. प्रत्येक विभागाने नागरिकांना योजनांची माहिती देत अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्र वितरण आणि विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी झाली.

शिबिरात सर्वाधिक तक्रारी घरकुल योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन), निराधार योजना आणि इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांबाबत** प्राप्त झाल्या. आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने समक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना देत अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा केला. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.

यावेळी बचत गट, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत, आयुष्मान भारत कार्ड, अपंग व निराधार लाभार्थी तसेच विविध वैयक्तिक लाभ योजनांतील पात्र नागरिकांना धनादेश आणि मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच एका गहू काढणी यंत्राचे आणि दोन ट्रॅक्टरचेही पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या शिबिरास अमळनेरचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अंजली गर्गे, पोलीस निरीक्षक पवन देसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, नायब निवासी तहसीलदार योगेश पाटील, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांनी सर्व विभागांच्या स्टॉलना भेट देत त्यांच्या कामकाजाचा आढावा घेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या.

सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल चार तास चाललेल्या या महसूल समाधान शिबिरात नागरिकांच्या प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले. नागरिकांचे समाधान होईपर्यंत मान्यवरांनी वेळ देत तक्रारी ऐकून त्यावर कार्यवाही केल्यामुळे शिबिराला आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले. ग्रामीण भागात प्रशासन लोकांच्या दारी पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर प्रभावी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound