मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अंतुर्ली येथील सौ. कुसुमताई तुकाराम महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पारंपरिक दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर विठ्ठलमय केला. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा सुंदर संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे माजी अध्यक्ष टिके पाटील यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष भागवतजी महाजन यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे उपाध्यक्ष श्री शरद महाजन, संचालक भाऊराव महाजन, विशाल पाटील तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या साथीने हरिनामाचा गजर करत गावातून मिरवणूक काढली. विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने संपूर्ण परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुलभा सुपडू शिरतुरे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियंका पवार यांचा सत्कार केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, श्री बबलू मेढे आणि कुलदीप महाजन यांनी शाळेचे व्यवस्थापक श्री मासुळे सर यांचा गौरव केला. या प्रसंगी अंतुर्लीचे पोलीस पाटील श्री किशोर मेढे, सामाजिक कार्यकर्ते बाबू शेख हुसेन, बी. बी. पाटील, व्ही. आर. महाजन, व्ही. एम. पंडित, श्री नामदेव भोई आदी मान्यवर उपस्थित होते. मुक्ताईनगर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे एस. ए. भोईसर यांनी चिमुकल्या वारकऱ्यांना आशीर्वाद देत भारतीय संस्कृतीची परंपरा जपण्याचे महत्त्व विशद केले. ह.भ.प. श्री मनोहर देव महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत इंग्रजी माध्यमातून आधुनिक शिक्षण घेत असतानाच भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि अध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करणे तितकेच आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. प्रियंका शरदचंद्र पवार, वरिष्ठ लिपिक श्री काशिनाथ पाटील, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच पालक प्रतिनिधी राहुल पाटील, गजानन घाटे, माणिक बेलदार, नितीन बेलदार आणि निरज कोळी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून समारोपापर्यंत मोलाचे सहकार्य केले. सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे श्री महेंद्र खडसे यांची पंढरपुरी बैलजोडी ठरली. या बैलजोडीमुळे दिंडीला पारंपरिक वारकरी संस्कृतीची अनोखी झलक लाभली आणि उपस्थित भाविकांसह विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरली.



