
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील वाढती व्यसनाधीनता, तरुण पिढीसमोरील आव्हाने आणि आई-वडिलांशी कमी होत चाललेला भावनिक संवाद या विषयांवर जनजागृती करण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे युवा व्याख्याते तथा समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

‘न समजलेले आई-बाप आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर ते युवक, पालक आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. आई-वडिलांनी मुलांच्या भविष्यासाठी केलेला त्याग, त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञतेची भावना तसेच तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवन जगण्याचे महत्त्व या व्याख्यानातून अधोरेखित करण्यात येणार आहे.
सुपो फाउंडेशनच्या वतीने या समाजप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या पाठीमागे, अभिनव इंग्लिश स्कूलसमोर, कुऱ्हा काकोडा येथे सकाळी १०.३० वाजता व्याख्यान होणार आहे.
आई-वडिलांचा सन्मान, व्यसनमुक्त तरुणाई आणि सुदृढ समाजनिर्मितीचा संदेश देणाऱ्या या व्याख्यानाचा युवक, पालक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



