रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील भगवती नगर परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट वीजमीटर बसविण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून विरोध होत असून, नागरिकांची संमती न घेता जबरदस्तीने मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बंटी महाजन यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नागरिकांच्या भावना व तक्रारी मांडत स्मार्ट मीटर ऐच्छिक स्वरूपातच बसविण्याची मागणी केली.
भगवती नगरातील अनेक रहिवाशांनी स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नाराजी व्यक्त करत ही बाब नगरसेवक बंटी महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर स्वीकारायचा किंवा नाही याचा निर्णय ग्राहकांचा असताना काही ठिकाणी त्यांची स्पष्ट संमती न घेता मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.

तक्रारींची दखल घेत नगरसेवक बंटी महाजन यांनी महावितरणचे अधिकारी श्री. सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या. यावेळी स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वाढत्या वीजबिलांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाची माहिती देण्यात आली. तसेच या योजनेबाबत अधिक पारदर्शकता आणि जनजागृतीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भगवती नगरातील रहिवासी मुरलीधर महाजन यांनी स्वतःचा अनुभव सांगताना, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर सुरुवातीचे वीजबिल कमी आले; मात्र त्यानंतरच्या महिन्यांत बिलात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले. अशाच प्रकारच्या तक्रारी परिसरातील इतर नागरिकांकडूनही समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बंटी महाजन यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी महाजन यांनी महावितरण प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांना वीज वापर नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, वीजबिल कमी राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्मार्ट मीटर योजना नागरिकांच्या विश्वासावर आधारित राबवावी आणि कोणत्याही ग्राहकावर त्याच्या इच्छेविरुद्ध मीटर बसविण्याची सक्ती करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.



