Home आरोग्य १३ वर्षीय मेंदूज्वरग्रस्त बालकाला नवजीवन ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांची...

१३ वर्षीय मेंदूज्वरग्रस्त बालकाला नवजीवन ; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांची यशस्वी कामगिरी

0
59

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेंदूला सूज येऊन गंभीर स्वरूपाचा एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झालेल्या यावल तालुक्यातील १३ वर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी वेळेत निदान करून अत्याधुनिक उपचार केल्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळाले आहे. अत्यंत चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या बालकाची प्रकृती डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे पूर्णपणे सुधारली असून सध्या तो धोक्याबाहेर आहे.

यावल तालुक्यातील या १३ वर्षीय बालकाला काही दिवसांपासून तीव्र ताप होता. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच वारंवार झटके येऊ लागल्याने त्याची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. काही वेळातच तो बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर आणि डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी कोणताही विलंब न करता बालकाला अतिदक्षता विभागात दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवले. त्याचबरोबर आवश्यक रक्त तपासण्या, मेंदूच्या कार्याचे मूल्यमापन आणि एमआरआय तपासणी तातडीने करण्यात आली. एमआरआय अहवालात बालकाच्या मेंदूला सूज आल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासणीनंतर त्याला एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झाल्याचे निश्चित झाले. हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून वेळेत उपचार न झाल्यास जीवाला धोका निर्माण होण्याबरोबरच कायमस्वरूपी मेंदूवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने तातडीने आवश्यक औषधोपचार, झटके नियंत्रित करणारी औषधे, संसर्गावरील उपचार आणि अतिदक्षता विभागातील सर्व आवश्यक उपचार सुरू केले.

उपचारादरम्यान बालरोग तज्ज्ञांसह डॉ. नावेद, डॉ. मिमोनी, डॉ. निशीगंधा, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, भूलतज्ज्ञ तसेच परिचारिका यांनी रात्रंदिवस बालकाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने समन्वयाने आणि अत्यंत तत्परतेने उपचार सुरू ठेवले. या अथक प्रयत्नांना यश मिळत बालकाच्या मेंदूची सूज कमी झाली, झटके थांबले आणि त्याला शुद्ध आली. त्यानंतर त्याला हळूहळू व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून तो बरा झाला आहे. यशस्वी उपचारानंतर बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण रुग्णालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. वेळेत निदान, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वित प्रयत्नांमुळे हा जीव वाचविणे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याबाबत माहिती देताना डॉ. मिमोनी यांनी सांगितले की, “एन्केफेलायटीस म्हणजे मेंदूला आलेली सूज हा अत्यंत गंभीर आजार आहे. ताप, तीव्र डोकेदुखी, वारंवार झटके, बेशुद्धावस्था, मानसिक गोंधळ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते.”


Protected Content

Play sound