Home Cities पारोळा महाराष्ट्र बंदला पारोळ्यातूनही पाठिंबा ; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

महाराष्ट्र बंदला पारोळ्यातूनही पाठिंबा ; वंचित बहुजन आघाडीचे पोलिसांना निवेदन

0
38

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पारोळा शहरातूनही पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, आंदोलनाची माहिती देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.

पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन केले असताना त्यांच्यावर बळाचा वापर झाल्याचा आरोप करत संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात देशभरात चर्चेत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांचाही उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

याशिवाय आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थी नेते अभिजित दीपके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचाही निषेध नोंदविण्यात आला. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून प्रशासनाला देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दयाराम ताराचंद मोरे, महासचिव श्रीकांतराव सोनवणे, शहराध्यक्ष कमलेश संजय सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख राहुल देविदास सरदार, तालुका युवा अध्यक्ष विजय राजेश बागुल, उपाध्यक्ष कांतीलाल प्रकाश करंजे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका मांडली.


Protected Content

Play sound