Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह ; नियमबाह्य नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

अमळनेरमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह ; नियमबाह्य नियुक्त्या रद्द करण्याची मागणी

0
22

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी (एसईओ) पदावर करण्यात आलेल्या नियुक्त्यांबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या अटी व निकषांचे उल्लंघन करून या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करणखेडे येथील ग्रामस्थांनी केला असून, संपूर्ण नियुक्ती प्रक्रियेची सखोल चौकशी करून नियमबाह्य नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी प्रांताधिकारी, अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

सामान्य प्रशासन विभागाने ३ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया आणि विविध निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. मात्र अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या नियुक्त्या या शासन निर्णयातील अटींचे पालन न करता करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवेदनानुसार, शासनाच्या नियमानुसार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीत किमान ३३ टक्के महिला प्रतिनिधित्व असणे अपेक्षित आहे. मात्र प्रसिद्ध झालेल्या निवड यादीत एकाही महिलेचा समावेश नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणालाही या प्रक्रियेत बगल देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला असून संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शकतेचा अभाव ठेवून गुप्तपणे पार पाडण्यात आल्याचा आरोप केला आहे. संबंधित गावांमध्ये कोणतीही सार्वजनिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली नाही किंवा इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेक पात्र नागरिकांना अर्ज करण्याची संधीच मिळाली नसल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. याशिवाय काही नियुक्त व्यक्तींच्या पात्रता, चारित्र्य पडताळणी तसेच इतर आवश्यक कागदपत्रांबाबतही प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याची शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी तालुक्यातील सर्व गावांतील विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्यांची सखोल चौकशी करून नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि भविष्यात अशा नियुक्त्या शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन व पूर्ण पारदर्शकतेनेच करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. हे निवेदन करणखेडे येथील शरद धनगर, गजानन कोळी, गणेश गुरव, विशाल सास्के, देवेंद्र पाटील आणि प्रमोद पवार यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जळगाव ग्रामीणचे खासदार, अमळनेरचे आमदार तसेच तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound