Home Cities जळगाव रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने वरणगाव-फुलगाव रस्ता धोकादायक ; तातडीने दुरुस्तीची प्रवासी संघटनेची...

रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने वरणगाव-फुलगाव रस्ता धोकादायक ; तातडीने दुरुस्तीची प्रवासी संघटनेची मागणी

0
21

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव ते फुलगाव दरम्यान रेल्वेखालील बोगद्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटना, वरणगाव यांनी वरणगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. सुनील भाऊ काळे यांना निवेदन देत बोगद्यातील पाणी निचरा आणि रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

प्रवासी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वरणगाव-फुलगाव मार्गावरील रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गाचा वापर दररोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच इतर प्रवासी करतात. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना घडत असून लहान चारचाकी वाहनांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांनाही या मार्गावरून सुरक्षितपणे चालणे कठीण झाले असून भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे.

निवेदनात नगरपरिषद प्रशासनाने बोगद्यातील पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच खराब झालेल्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न करता आवश्यक कार्यवाही करण्याची अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे. हे निवेदन प्रवासी संघटना, वरणगाव यांच्या वतीने अध्यक्ष निलेश वसंत चौधरी आणि सचिव फजल मोहम्मद यांनी सादर केले असून, नागरिकांच्या हितासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound