अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी नदी माता जन्मोत्सवानिमित्त अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांनी तापी मातेला साडी-चोळी अर्पण करून विधीवत पूजा केली. अमळनेर मतदारसंघ जलसंपन्न, समृद्ध आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, अशी मनोभावे प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
आई तापीच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या श्रद्धाभावाने पूजन करण्यात आले. सौ. जयश्री पाटील यांनी तापी मातेला साडी-चोळी अर्पण करत जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी तापी नदी ही परिसराच्या जीवनवाहिनी असल्याचे सांगत तिच्या कृपेने अमळनेर मतदारसंघ कायम सुजलाम, सुफलाम आणि जलसंपन्न राहावा, अशी प्रार्थना केली.

पूजनानंतर बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस उत्पादन यावे, त्यांच्या जीवनात आनंद, भरभराट आणि आर्थिक समृद्धी नांदावी, तसेच अमळनेर शहराची पाणीटंचाई कायमची दूर होऊन नागरिकांची तहान अखंडितपणे भागत राहावी, अशी भावना व्यक्त केली. तापी मातेसमोर संपूर्ण परिसराच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठीही त्यांनी मंगलकामना केल्या. यावेळी “आई तापीचे अखंड आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत आणि जलसमृद्धीच्या माध्यमातून विकासाचा प्रवाह अविरत सुरू राहो,” अशी प्रार्थना करत त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि जलस्रोतांचे जतन करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण व शहर पदाधिकारी, अमळनेर नगरपालिकेचे नगरसेवक व नगरसेविका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनीही तापी मातेला फुले अर्पण करून विधीवत पूजन करत परिसराच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.



