जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील वनकोठे शिवारातील वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी अनेक वर्षांपूर्वी दिलेली शेतीची जमीन आता मूळ मालक शेतकऱ्यांना परत मिळावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारखाना सुरू होईल, परिसराचा विकास होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेवर जमीन दिली होती. मात्र आता कारखाना विक्रीस काढण्यात आल्याने आपण फसवले गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, एरंडोल तालुक्यातील वनकोठे शिवारातील वसंत सहकारी साखर कारखान्यासाठी त्यांनी त्यावेळी अत्यल्प दरात आपल्या सोन्यासारख्या शेतीजमिनी विकल्या होत्या. कारखाना सुरू झाल्यानंतर स्थानिक विकासाला चालना मिळेल आणि परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांना देण्यात आला होता. मात्र अनेक वर्षे उलटल्यानंतरही अपेक्षित विकास झाला नाही. उलट जिल्हा बँकेने संबंधित साखर कारखाना विक्रीस काढल्याची माहिती समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात, “आमची फसवणूक झाली असून आता आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून संबंधित जमीन मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कारखाना उभारणीसाठी दिलेल्या जमिनींचा मूळ उद्देश पूर्ण झाला नसल्याने त्या जमिनी परत देणे न्याय्य ठरेल, असेही शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशाराही दिला असून, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



