
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक लोककलेची ओळख नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना करून देत तिच्या संवर्धनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या वतीने शानबाग निवासी विद्यालय येथे पारंपरिक लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला. शाहिरी पोवाडा, भारुड, गोंधळ, पारंपरिक गण तसेच शिवकालीन ‘करपावली’ या लोककला प्रकारांचे प्रत्यक्ष सादरीकरण विद्यार्थ्यांसमोर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शानबाग निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष व मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल तसेच परिषदेचे प्रमुख कार्यवाहक आणि लोककलेचे अभ्यासक शाहीर विनोद ढगे यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि लोककला प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक शाहीर विनोद ढगे यांनी केले. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ही राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात अनेक पारंपरिक कलाप्रकार लोप पावण्याच्या मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांना या कलांची प्रत्यक्ष ओळख करून देणे आवश्यक आहे. त्यातून पुढील पिढीमध्ये लोककलांविषयी आवड निर्माण होऊन या परंपरांचे संवर्धन होण्यास मदत होईल, असे शाहीर विनोद ढगे यांनी यावेळी सांगितले. शिबिरात शाहीर विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेची माहिती देताना शाहिरी कलेचे स्वरूप आणि पोवाड्याच्या परंपरेचा इतिहास समजावून सांगितला. त्यानंतर त्यांनी शाहिरी पोवाडा आणि भारुडाचे प्रभावी सादरीकरण केले. भारुडाच्या सादरीकरणात बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य मोहित पाटील आणि अवधूत दलाल यांनीही सहभाग घेतला.
मनोरंजन, विनोद, उपरोध आणि सामाजिक प्रबोधन यांचा प्रभावी संगम असलेल्या भारुडाच्या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पारंपरिक कलांच्या माध्यमातून सामाजिक संदेश प्रभावीपणे कसा पोहोचविला जातो, याचा अनुभव विद्यार्थ्यांना या सादरीकरणातून मिळाला. प्रशिक्षण शिबिरात पारंपरिक गण, शाहिरी पोवाडा, भारुड आणि गोंधळासोबतच शिवकालीन ‘करपावली’ या वैशिष्ट्यपूर्ण लोककला प्रकाराचेही सादरीकरण करण्यात आले. ज्येष्ठ लोककलावंत अरुण जोगी, अशोक जोगी आणि बबन जोगी यांनी शिवकालीन करपावलीचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना या लोककलेची प्रत्यक्ष ओळख करून दिली.
गोंधळ या पारंपरिक लोककला प्रकाराचे सादरीकरण अवधूत दलाल आणि गजानन साळुंखे यांनी केले. विविध लोककला प्रकारांचे केवळ सादरीकरण न करता त्यांचा इतिहास, परंपरा, सांस्कृतिक महत्त्व आणि सादरीकरणाची वैशिष्ट्ये याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या अध्यक्ष नीलम शिर्के-सावंत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात अशा लोककला प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पारंपरिक लोककलेची माहिती आणि प्रशिक्षण पोहोचविण्याचा संकल्प परिषदेने केला आहे. या उपक्रमांतर्गत जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ आदी ठिकाणीही लोककला प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या विविध शिबिरांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आजच्या आधुनिक युगात अनेक पारंपरिक लोककला प्रकार हळूहळू लोप पावत आहेत. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना लोककलांची प्रत्यक्ष ओळख करून देणे, त्यांच्या मागील इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा समजावून सांगणे तसेच भावी पिढीमध्ये या कलांविषयी आस्था निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
शानबाग निवासी विद्यालयातील शिबिरामुळे विद्यार्थ्यांना केवळ लोककला पाहण्याची संधी मिळाली नाही, तर त्या कलांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घेण्याची संधीही मिळाली. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य दर्शन गुजराती, मोहित पाटील, अवधूत दलाल तसेच शानबाग निवासी विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या अखेरीस सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.



