वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभर गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविण्यासाठी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वरणगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी (20 जुलै) भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्या प्रतिभा तावडे यांनी केले आहे.
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निष्पक्ष चौकशीची मागणी करत तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी वरणगावात हा शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा सोमवार, 20 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता नगरपरिषद कार्यालय, वरणगाव येथून सुरू होणार असून वरणगाव पोलीस स्टेशन येथे त्याची सांगता होईल. यावेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. “विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, अन्यायाच्या विरोधात… चला एकत्र येऊया!” असा संदेश देत आयोजकांनी सर्व घटकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मोर्चाद्वारे नीट परीक्षा घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच प्रामाणिक विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना न्याय मिळावा आणि जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी भूमिका महाविकास आघाडीने मांडली आहे. हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. वरणगाव शहरासह परिसरातील सर्व सुजाण नागरिक, विद्यार्थी, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.



