जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रोहन घुगे यांनी शनिवारी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देत मतदार नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या कामकाजाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत १३-जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील तांबापुरा, सिंधी कॉलनी, दीक्षित वाडी आणि विठ्ठल पेठ या परिसरांना जिल्हाधिकारी घुगे यांनी भेट दिली. पाहणीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या प्रत्यक्ष कामकाजाची बारकाईने तपासणी करण्यात आली. मतदार नोंदणी, पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधत मतदार नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि गतीमान व्हावी यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर काटेकोरपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.

“एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये,” या उद्देशाने निवडणूक प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पाहणीवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही मतदार नोंदणी प्रक्रियेतील प्रगतीचा आढावा घेत आवश्यक बाबींवर चर्चा केली.



