Home क्राईम अडावद पोलिसांचा अवैध गावठी दारूभट्टीवर छापा ; दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट 

अडावद पोलिसांचा अवैध गावठी दारूभट्टीवर छापा ; दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट 

0
8

अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत पांढरी शिवारातील एका अवैध दारूभट्टीवर धडक छापा टाकला. या कारवाईत तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला असून, संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सचिन नगरे, सहायक फौजदार जितेंद्र सोनवणे, पोलीस हवालदार किरण रमेश शिरसाठ, शेषराव तोरे, भरत नाईक, पोलीस शिपाई भूषण राजेंद्र चव्हाण आणि प्रदीप पाटील यांच्या पथकाने पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी सुरू असलेल्या अवैध दारूभट्टीवर छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांना घटनास्थळी २,००० लिटर गूळ-नवसागर मिश्रित कच्चे व पक्के रसायन भरलेले १२ प्लास्टिक ड्रम, लोखंडी पत्र्याची टाकी, लाकडी पेटती चूल, भट्टीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच ४० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. या सर्व साहित्याची एकूण किंमत १ लाख ५१ हजार रुपये इतकी असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार किरण शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कैलास काशिनाथ कोळी (वय ३३, रा. इंदिरा नगर प्लॉट भाग, अडावद) याच्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत. या कारवाईनंतर परिसरातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरू राहणार नाहीत. बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”


Protected Content

Play sound