Home क्राईम अमरावतीतील ट्रक चालक हत्या प्रकरणाचा छडा ; रावेरातून पंजाबच्या आरोपीला अटक 

अमरावतीतील ट्रक चालक हत्या प्रकरणाचा छडा ; रावेरातून पंजाबच्या आरोपीला अटक 

0
17

रावेर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे ट्रक चालकाची हत्या करून मृतदेहासह ट्रकला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जळगाव जिल्ह्यातील रावेर येथून पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत ही धडाकेबाज कारवाई करत गंभीर गुन्ह्याचा छडा लावला. या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिसांच्या समन्वयाचे कौतुक होत आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८, रा. अमृतसर, पंजाब) असे आहे. आरोपी गुन्हा केल्यानंतर पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार तो रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे समजताच रावेर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उभ्या ट्रकच्या केबिनमध्ये ट्रक चालकाचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचा भास होत असला तरी तपासादरम्यान पोलिसांना हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय बळावला. त्यानंतर तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून संशयित आरोपीबाबत माहिती दिली. त्यानंतर रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने रेल्वे स्थानकासह परिसरात शोधमोहीम राबवली. आरोपीचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध असूनही पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत त्याला शिताफीने अटक केली.

प्राथमिक चौकशीत आरोपीने पैशांच्या वादातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेहासह PB-02-EW-4299 क्रमांकाच्या ट्रकला आग लावल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे खुनामागील हेतू आणि संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू आहे. सध्या आरोपी रावेर पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना झाले आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound