मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून, घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची आणखी एक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली येथील श्री गणेश फोटो स्टुडिओचे संचालक अभिनय नाईक यांच्या मालकीची MH 19 AT 0887 क्रमांकाची काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना 125 ही दुचाकी घरासमोर उभी करण्यात आली होती. रात्री सुमारे १२ नंतर अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. सकाळी दुचाकी नेहमीच्या ठिकाणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरात शोधाशोध करण्यात आली. नातेवाईक व मित्रमंडळींकडेही चौकशी करण्यात आली. मात्र, दुचाकीचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यामुळे संबंधितांनी चोरीची माहिती पोलिसांना देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अंतुर्ली परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी वाहनांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवावे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली आहे. चोरीच्या वाढत्या घटनांवर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.



