Home Cities पारोळा पारोळ्यात स्मार्टमीटरची सक्ती थांबवा, अन्यथा जनआंदोलन – नगरसेवक विवेक पाटील

पारोळ्यात स्मार्टमीटरची सक्ती थांबवा, अन्यथा जनआंदोलन – नगरसेवक विवेक पाटील

0
15

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वीजबिले वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वेळेवर वीजबिले न मिळाल्यामुळे ग्राहकांना विलंबाने बिल भरावे लागत असून त्यातून अतिरिक्त विलंबशुल्काचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप नगरसेवक विवेक पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नागरिकांसह महावितरण प्रशासनाला निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

नगरसेवक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात प्रत्येक महिन्याचे वीजबिल ग्राहकांना वेळेवर वितरित करण्यात यावे, जेणेकरून ग्राहकांना अनावश्यक विलंबशुल्क भरावे लागणार नाही आणि त्यांची आर्थिक व मानसिक गैरसोय टळेल, अशी मागणी करण्यात आली. अनेक नागरिकांना नियमितपणे बिले मिळत नसल्यामुळे त्यांना देय तारखेची माहिती उशिरा मिळते आणि त्याचा थेट आर्थिक फटका बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शहरात सुरू असलेल्या स्मार्टमीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. स्मार्टमीटरबाबत नागरिकांमध्ये विविध शंका व तक्रारी असून, कोणत्याही ग्राहकावर त्याची सक्ती करण्यात येऊ नये, अशी भूमिका नगरसेवक विवेक पाटील यांनी मांडली. नागरिकांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या शंकांचे समाधान केल्यानंतरच स्मार्टमीटरची प्रक्रिया पुढे राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. महावितरण प्रशासनाने नागरिकांच्या समस्या गांभीर्याने न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही विवेक पाटील यांनी दिला. “वेळेवर वीजबिले द्या, स्मार्टमीटरची सक्ती थांबवा; अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन व्यापक आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.

या निवेदनावेळी शोएब खान, भूषण निकम, अजय पाटील, संकेत पाटील, गणेश महाजन, निखिल पवार, रवी नाईक यांच्यासह प्रभाग क्रमांक ११ मधील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनीही वीजबिल वितरणातील अनियमिततेबाबत नाराजी व्यक्त करत महावितरणने तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी केली. दरम्यान, या मागण्यांवर महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेते आणि वीजबिल वितरणातील गोंधळ दूर करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे आता पारोळा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound