जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला सुमारे ६ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(४), १२६(२) व ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मुस्कीन रोहेब सय्यद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे मोटारसायकलवरून जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्याने जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. फिर्यादीकडे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या ताब्यातील सुमारे ६ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गंगणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे अक्षय मुकेश अटवाळ या संशयितास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने साथीदार चंद्रकांत रमेश दिवेकर याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला. तपासादरम्यान आरोपी अक्षय अटवाळ याच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी व चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगनाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बंजारी तसेच पोलीस कर्मचारी अकरम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, छगन तायडे, प्रदीप सपकाळे आणि राहुल राडे यांच्या पथकाने केली. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक शिरसाठ करीत आहेत.



