पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन क्षमतेत वाढ करून शेतीला बळकटी देणाऱ्या पद्मालय (पद्मालय धरण-२) सिंचन प्रकल्पाला आता वेग येणार आहे. सुमारे ६५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या कामाची आमदार ॲड. अमोल पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता कायम राखून येत्या एका वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
तालुक्यातील १९८२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आमदार अमोल पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी पद्मालय धरण परिसराला भेट देत प्रकल्पाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता उत्तम दाभाडे, उपअभियंता आरती सूर्यवंशी, कंत्राटदार मनोज शर्मा, कंत्राटदार प्रतिनिधी कुणाल बोरसे, अभियांत्रिकी सहाय्यक अमोल सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य भिका कोळी, युवासेना माजी तालुकाप्रमुख बबलू पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळीचे सरपंच बाळासाहेब पाटील, रिंगणगावचे सरपंच आबा मते, गालापूरचे सरपंच आरिफदादा तसेच खडके बुद्रुक येथील गोटू पाटील उपस्थित होते.

पाहणीदरम्यान बंदिस्त नलिका वितरण प्रणाली, वितरण जाळे, रस्ता क्रॉसिंग, नाला क्रॉसिंग, पाणी वापर संस्था इमारती तसेच इतर अनुषंगिक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार कामासोबतच नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना देताना आमदार अमोल पाटील यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर नियोजन करण्यावर भर दिला. या प्रकल्पामुळे १९८२ हेक्टर क्षेत्राला आधुनिक व कार्यक्षम सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. बंदिस्त नलिका प्रणालीमुळे पाण्याचा अपव्यय, गळती आणि बाष्पीभवन कमी होऊन पाणी थेट शेतापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होईल. तसेच सिंचनाचा खर्च कमी होण्याबरोबरच शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रमही वाचणार असून पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
या योजनेमुळे वर्षभर विविध पिके घेण्यास चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेती अधिक आधुनिक, जलसंपन्न आणि शाश्वत करण्यासाठी हा प्रकल्प एरंडोल तालुक्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हितासाठी सिंचन सुविधांचा विस्तार करण्यावर भर देत आमदार अमोल पाटील सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पद्मालय धरणाच्या या प्रकल्पामुळे एरंडोल तालुक्यातील कृषी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.



