Home क्राईम धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश ; चौघे जेरबंद

धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश ; चौघे जेरबंद

0
86

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धावत्या लक्झरी बसमधून २५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या चौघा सराईत आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत अटक करत मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा येथील नितीन पुरुषोत्तम वाणी हे जळगावातील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून खासगी कुरिअरचे काम करतात. दि. ११ जुलै २०२६ रोजी ते कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपयांची रोकड घेऊन हरे कृष्णा ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने निघाले होते.

सायंकाळी सुमारे ८.३० वाजता बस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील साई सुरुची लॉजिंग अँड रेस्टॉरंट येथे जेवणासाठी थांबली. नितीन वाणी जेवणासाठी खाली उतरले असता त्यांनी रोकड असलेली बॅग बसमध्येच ठेवली होती. जेवण करून परत आल्यानंतर बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रवाशांचा विलंब टाळण्यासाठी बस पुढे रवाना झाल्यानंतरही बॅगेचा शोध लागला नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा सराईत आरोपी सोनू उर्फ राम भगवान सारवाण (वय ३२, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याने केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या तीन साथीदारांची नावे उघड केली.

यानंतर पोलिसांनी शेख रहेमान शेख निसार (वय ३३, पिंप्राळा हुडको), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (वय ३८, कोल्हे नगर) आणि दशरथ सुरेश चौधरी (वय ३६, खंडेराव नगर, पिंप्राळा) या तिघांनाही ताब्यात घेतले. चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपासात आरोपी शेख रहेमान याने गुन्हा करण्यासाठी स्वतःची मारुती डिझायर (एमएच-४७-सीयू-७८७७) उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मुख्य आरोपी सोनू उर्फ राम भगवान सारवाण याच्याविरुद्ध यापूर्वीही जळगाव शहर, शनिपेठ आणि भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यांत मारहाण, दरोडा, घरफोडी, चोरी आणि शासकीय कामात अडथळा आणण्यासह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील तसेच पोलीस अंमलदार राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, रवींद्र कापडणे आणि छगन तायडे यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound