Home प्रशासन दीपनगर बीटीपीएसमध्ये स्थानिक कंत्राटदारांचा संताप; बाहेरील ठेकेदारांना विरोध

दीपनगर बीटीपीएसमध्ये स्थानिक कंत्राटदारांचा संताप; बाहेरील ठेकेदारांना विरोध

0
19

दीपनगर ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र (बीटीपीएस) परिसरात स्थानिक कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक कंत्राटदारांना डावलून सातत्याने बाहेरील ठेकेदारांना कामे दिली जात असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. स्थानिकांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

स्थानिक कंत्राटदारांच्या बैठकीत बीटीपीएस प्रशासनाने नवीन कंत्राट धोरण जाहीर करताना स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या विकासकामांमधून बाहेरील कंपन्यांना आर्थिक लाभ मिळत असून स्थानिक कंत्राटदार आणि कामगार मात्र वंचित राहत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, अनेक महत्त्वाची व मोठ्या रकमेची कामे बाहेरील कंपन्यांना दिली जात आहेत. यामुळे स्थानिक रोजगारावर परिणाम होत असून परिसरातील व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. प्रशासनाने तातडीने धोरणात बदल करून स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी काही कंत्राटदारांनी कामे पूर्ण न करताही किंवा निकृष्ट दर्जाची कामे करूनही त्यांची बिले मंजूर झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

स्थानिक कंत्राटदारांना न्याय मिळाला नाही आणि कथित गैरव्यवहारांची चौकशी झाली नाही, तर आगामी काळात बीटीपीएस प्रशासनाविरोधात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला. या घडामोडींमुळे दीपनगर परिसरातील कंत्राटी कामांच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.


Protected Content

Play sound