Home Cities जळगाव जळगावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

जळगावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

0
3

 जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या पुढाकारातून प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येणार आहे. आषाढी एकादशी आणि पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर या अभियानाच्या कालावधीत वाढ करण्यात आली असून, आता २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणत्याही एका दिवशी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाच्या नियोजनाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार सुरुवातीला २२, २५ आणि २६ जुलै या तीन दिवसांपैकी एका दिवशी शिबिर आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने राज्यातील अनेक नागरिक व लोकप्रतिनिधी पंढरपूर वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना या अभियानाचा लाभ मिळावा, यासाठी शिबिरांच्या आयोजनासाठी २ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या अभियानासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच हजार कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, संपूर्ण राज्यात दहा लाख कुटुंबांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्याचे नियोजन शासनाने केले आहे. समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वितरण, गावठाण जागांचे वाटप, स्वामित्व सनद वितरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच महसूल विभागाची ‘जिवंत सातबारा’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

याशिवाय निवासी व व्यावसायिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी ‘विशेष अभय योजना-२०२५’ अंतर्गत मुदतवाढीचा लाभ, शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटपपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याची सुविधा, कुंभार समाजातील नागरिकांना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना तसेच वंचित, अनाथ आणि गरजू घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जिल्हा परिषद आणि लीड बँकसह विविध विभागांची आढावा बैठक पार पडली आहे. सर्व संबंधित विभागांना तालुकानिहाय आणि योजनानिहाय पात्र लाभार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियोजनबद्ध पद्धतीने शिबिरांचे आयोजन करण्यावर भर देण्यात आला आहे.

महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे स्वतः या शिबिरांना उपस्थित राहून अभियानावर देखरेख ठेवणार आहेत. या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, कलाकार, साहित्यिक, क्रीडापटू तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचाही सक्रिय सहभाग राहणार असून, नागरिकांमध्ये शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानात’ सहभागी होऊन उपलब्ध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound