Home Cities पारोळा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानाला पारोळ्यात सुरुवात 

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानाला पारोळ्यात सुरुवात 

0
12

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या जनजागृती कार्यक्रमाचे पारोळा शहरात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट व्हावे आणि कोणताही मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात नागरिकांना मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील नगरसेवक राजूभाऊ कासार, प्रमोदशेठ कासार आणि निर्मलाताई वाणी यांच्या पुढाकारातून या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमोल पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीन सोनार, नगरसेवक राजूभाऊ कासार, प्रमोदशेठ कासार, विनोद पाटील, भूषण टिपरे, सामाजिक कार्यकर्ते जे. के. आण्णा पाटील, श्री बालाजी मंदिर संस्थानचे विश्वस्त रमेश भगवती, संदेश शिरोळे, शाम शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नागरिकांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानाचे उद्दिष्ट, मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरण्याची प्रक्रिया तसेच मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्यासाठी उपलब्ध असलेल्या BLO आणि ECINET अॅपच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नागरिकांनी डिजिटल माध्यमांचा वापर करून आपली माहिती वेळेत अद्ययावत करण्याचे आवाहनही करण्यात आले. वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, लोकशाहीची खरी ताकद ही अचूक आणि अद्ययावत मतदार यादीमध्ये आहे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे मतदारांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्याची मतदार यादीतील नोंद तपासून आवश्यक असल्यास तातडीने माहिती आणि कागदपत्रे सादर करावीत.

कार्यक्रमात विशेषतः एरंडोल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना उद्देशून आवाहन करण्यात आले की, मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने SIR अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा आवश्यक बदल वेळेत पूर्ण केल्यास भविष्यात मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “सशक्त लोकशाहीसाठी अद्ययावत मतदार यादी हीच खरी ताकद” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत SIR अभियानाची माहिती पोहोचवून मतदानाचा घटनात्मक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound