Home Cities यावल यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत काँक्रीटीकरणाला सुरुवात; सुविधा सक्षम होणार

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत काँक्रीटीकरणाला सुरुवात; सुविधा सक्षम होणार

0
17

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, या कामामुळे शेतकऱ्यांना आपले शेतीमाल सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर पद्धतीने ठेवता येणार आहे. या निर्णयामुळे बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सर्वसामान्य नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

यापूर्वी बाजार समितीच्या परिसरात सर्वत्र चिखल आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीसाठी आणताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः धान्य, केळी आणि इतर कृषी उत्पादनांची साठवण करताना माल खराब होण्याची भीती तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते.

ही समस्या लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने शेतकरी हिताला प्राधान्य देत समितीच्या उत्पन्नातून परिसराचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. निर्णयानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली असून, काम पूर्ण झाल्यानंतर बाजार समितीचा परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुटसुटीत होणार आहे.

या विकासकामामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखलाच्या त्रासातून मोठा दिलासा मिळणार असून, शेतीमालाची हाताळणी आणि साठवण अधिक सुलभ होईल. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहारही अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सभापती उज्जैनसिंग राजपूत व संपूर्ण संचालक मंडळाने शेतकरी हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, भविष्यातही अशाच सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound