Home प्रशासन नगरपालिका मदिना नगरमधील सार्वजनिक रस्ता अतिक्रमणमुक्त करा; नगरपालिकेला ४८ तासांचा इशारा

मदिना नगरमधील सार्वजनिक रस्ता अतिक्रमणमुक्त करा; नगरपालिकेला ४८ तासांचा इशारा

0
13

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सावदा शहरातील मदिना नगर परिसरातील गट क्रमांक १२३१ मधून जाणारा सार्वजनिक रस्ता बेकायदेशीर अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र सादर केले आहे. ४८ तासांच्या आत अतिक्रमण हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा माहितीचा अधिकार (RTI) तसेच लोकायुक्तांकडे दाद मागण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधित रस्ता महसूल विभागाच्या ७/१२ उताऱ्यात तसेच अधिकृत नकाशामध्ये सार्वजनिक रस्ता म्हणून नोंदलेला आहे. मात्र गट क्रमांक १२३१ मधील काही व्यक्तींनी या रस्त्यावर अतिक्रमण करून मार्ग पूर्णपणे बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अतिक्रमणामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना डायमंड इंग्लिश स्कूलमध्ये जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. तसेच मशिद आणि शनी मंदिराकडे जाणाऱ्या नागरिकांनाही दीड किलोमीटरपर्यंत अतिरिक्त अंतर पायी पार करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सुमारे पाच हजार लोकवस्ती असलेल्या या भागासाठी हा प्रमुख दळणवळणाचा मार्ग असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १७९ आणि १८० नुसार सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला आहेत. त्यामुळे तातडीने जागेची पाहणी करून अतिक्रमण हटवावे आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या स्मरणपत्रासोबत गट क्रमांक १२३१ व १२३३ चे ७/१२ उतारे, अतिक्रमण दर्शविणारी छायाचित्रे, परिसराचा नकाशा तसेच नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची यादी जोडण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती सावदा पोलीस स्टेशन, तहसीलदार रावेर, विभागीय आयुक्त (नाशिक) तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनाही पाठविण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.


Protected Content

Play sound