Home क्राईम अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या ; 24 तासांत दोन आरोपींना अटक

अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या ; 24 तासांत दोन आरोपींना अटक

0
3

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील तरुणाच्या खूनप्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत रावेर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाईत दोन फरार आरोपींना जेरबंद केले आहे. अनैतिक संबंधांच्या संशयातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, आरोपींनी गुन्ह्याची तोंडी कबुली दिली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी शेख सलमान शेख शब्बीर (वय २७, रा. ऐनपूर, ता. रावेर) यांनी आपल्या मोठ्या भावाचा, शेख कुरबान उर्फ ममत शेख शब्बीर (वय ३०) यांचा खून झाल्याची तक्रार दिली होती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश विजन उर्फ संजय घोरपडे (वय २५, रा. भोर रेल्वे स्टेशन परिसर, रावेर) याचे मृताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. काही महिन्यांपूर्वी मृताच्या पत्नीच्या घरी आरोपी रात्रीच्या वेळी गेल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी गावकऱ्यांनी आरोपीला पकडून मारहाण केली होती. या घटनेची माहिती मृत शेख कुरबान व त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला जाब विचारला होता. याच वेळी आरोपीने मृताला धमकी देत, “तुझी पत्नी आणि माझे एकमेकांवर प्रेम आहे. आमच्यामध्ये आलास तर तुला जिवंत सोडणार नाही,” असे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेचा राग मनात धरून आरोपी गणेश घोरपडे याने मेघराज वसंत सांगळे (वय ३१, रा. भोर रेल्वे स्टेशन परिसर, रावेर) याच्या मदतीने कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तपासानुसार, ९ जुलै २०२६ रोजी रात्रीपासून ११ जुलै २०२६ रोजी सकाळपर्यंतच्या कालावधीत नांरखेडा शिवारातील शेत गट क्रमांक ९६ मधील शेतात शेख कुरबान यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रावेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपींचा माग काढला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी संगनमताने खून केल्याची तोंडी कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना १२ जुलै २०२६ रोजी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींना २७ जुलै २०२६ पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत विवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडगुजर आणि रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच रावेर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound