जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता वेगाने विकसित होत असलेल्या हरित उद्योग (Green Business) क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले आहे. वाढते शहरीकरण, पर्यावरणपूरक धोरणे आणि पुनर्वापराला मिळणारे प्रोत्साहन यामुळे या क्षेत्रात रोजगार आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘अमृत’ (AMRUT) आणि ‘कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ‘अमृत-सक्षम’ हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम राबविण्यात येत असून, युवक, महिला आणि इच्छुक उद्योजकांना हरित व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन कचऱ्याचे मूल्यवर्धन करून शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद आणि काच पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग), तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणे यांसारख्या विविध व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. योग्य तांत्रिक प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी उद्योग उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. स्वतःचा उद्योग सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे उद्योजक, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे नागरिक या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना विविध शासकीय आणि संस्थात्मक योजनांचा लाभही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अमृत-सक्षमच्या नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरावा किंवा अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ‘अमृत-सक्षम’चे पथक दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित जिल्ह्यातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती देणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या व्यवसाय क्षेत्राची प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUTच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर विशेष थेट (लाईव्ह) मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी या सत्रात सहभागी होऊन हरित उद्योगातील संधी, प्रशिक्षण आणि व्यवसाय उभारणीबाबत सविस्तर माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७५७०९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.



