अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धुळे येथील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे हिच्या आत्महत्येच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून हा खटला विशेष जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविण्यात यावा, अशी मागणी अमळनेर युवा परिट (धोबी) मंडळ आणि समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी भूमिका मंडळाने मांडली आहे.
धुळे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, धुळे शहरातील गोडीबार टेकडी परिसरातील रहिवासी तथा श्री. जितेंद्र ठाकरे यांची १५ वर्षीय कन्या जानवी ठाकरे हिच्या आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, अल्पवयीन मुलीचा मानसिक छळ करण्यात आला आणि त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून महिला सुरक्षितता, सामाजिक संवेदनशीलता आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

अमळनेर युवा परिट मंडळाच्या म्हणण्यानुसार, स्थानिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तातडीने पोलिसांकडे धाव घेत सखोल चौकशीची मागणी केली होती. संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असली तरी केवळ अटक पुरेशी नसून, तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींवर कायद्यातील कठोर कलमांनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच, संबंधित गुन्ह्याचा खटला विशेष जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) वर्ग करण्यात यावा, जेणेकरून दीर्घ न्यायप्रक्रियेमुळे विलंब न होता पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळू शकेल, अशीही मागणी करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेने या प्रकरणाचा प्राधान्याने विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
अमळनेर येथील समाजबांधवांनी १३ जुलै रोजी लोकशाही मार्गाने एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदविला. आंदोलन संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट करत, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर अमळनेर युवा परिट (धोबी) मंडळाचे अध्यक्ष रविंद्र साहेबराव जाधव, सचिव विजय शिवाजी वाघ यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या असून, पीडित मुलीला न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.



