मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी–बोदवड मार्गावरून हरताळा येथील चक्रधर स्वामी मंदिर आणि तलाव परिसराकडे जाणारा वन विभागाच्या अखत्यारीतील जुना रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी माजी विशेष कार्यकारी अधिकारी अतुल जावरे यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासह धार्मिक पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हरताळा–निमखेडी नर्सरी परिसरातील वन विभागाच्या हद्दीत पूर्वी नागरिकांसाठी रस्ता उपलब्ध होता. मात्र, अनेक वर्षांपासून या मार्गाचा वापर बंद झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर झाडे, काटेरी झुडपे आणि वनस्पती वाढल्या असून रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर नागरिकांना करता येत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. निवेदनानुसार, हा रस्ता सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. विशेषतः प्रत्येक शनिवार, मंगळवार आणि गुरुवारी हजारो भाविक शिरसाळा येथील हनुमान मंदिर तसेच श्रीकृष्ण आणि चक्रधर स्वामी मंदिरात दर्शनासाठी ये-जा करतात. सध्या पर्यायी मार्गाने अधिक अंतर पार करावे लागत असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अतुल जावरे यांनी या मार्गामुळे हरताळा तलाव परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विकास होऊ शकतो, असे मत व्यक्त केले आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. तसेच वन विभागाच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमांनाही याचा सकारात्मक लाभ होईल, असा दावा त्यांनी केला आहे. निवेदनात उदाहरण म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव परिसरातील वन विभागाच्या अखत्यारीतील रस्ता नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर हरताळा–निमखेडी मार्गाबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



