Home Cities जळगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी CEO करिश्मा नायर यांचा थेट व्हिडिओ...

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी CEO करिश्मा नायर यांचा थेट व्हिडिओ संवाद

0
17

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा दर्जा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवारी जिल्हा परिषद शाळा, डोंगर कठोरे येथील वर्गाशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराची प्रत्यक्ष पडताळणी करत त्यांनी शिक्षकांच्या नियोजनाचीही सखोल माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचे कौतुक करत सातत्यपूर्ण प्रयत्नांवर त्यांनी भर दिला.

निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तासिकांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शिक्षक राहुल वाणी यांच्या वर्गाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत प्रत्येक विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे, याची माहिती जाणून घेतली. संबंधित स्तरानुसार विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या अध्ययन प्रगतीची तपासणी करण्यात आली. तसेच कृती आराखडा आणि त्या दिवसाच्या नियोजनानुसार कोणते अध्यापन झाले, याबाबत शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडूनही माहिती घेण्यात आली.

संवादादरम्यान स्तर ५ वरील विद्यार्थ्यांकडून २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन करून घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना बिनहातच्याची बेरीज फळ्यावर करण्यास सांगत त्यांच्या गणितीय कौशल्याची चाचपणी करण्यात आली. यानंतर प्रगत स्तरातील एका विद्यार्थिनीला १०० पर्यंतच्या दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज करण्यास सांगितले असता तिने अचूक उत्तर दिले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विशेष कौतुक केले.

यानंतर स्तर ५ वरील एका विद्यार्थिनीला वाचन करण्यास सांगण्यात आले. तिचे वाचन ऐकल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. पुढे प्रगत गटातील एका विद्यार्थिनीने पुस्तकातील उतारा वाचताना जोडाक्षरयुक्त शब्द आणि वाक्यांचे अचूक व प्रभावी वाचन केले. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल करिश्मा नायर यांनी अभिनंदन करत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

व्हिडिओ संवादाच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, शिक्षकांचे नियोजन आणि निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांनी सातत्याने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू ठेवावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषद शाळांमध्ये निपुण भारत अभियान प्रभावीपणे राबविले जात असून विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व अंकज्ञान विकासासाठी शिक्षकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची या व्हिडिओ आढाव्याद्वारे दखल घेण्यात आली. अशा नियमित शैक्षणिक आढाव्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यास आणि शिक्षण व्यवस्थेत अधिक परिणामकारकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

 


Protected Content

Play sound