Home क्राईम रावेरमधील सौर ऊर्जा प्रकल्पावर धाडसी चोरी ; साडेसहा लाखांचे डीसी केबल व...

रावेरमधील सौर ऊर्जा प्रकल्पावर धाडसी चोरी ; साडेसहा लाखांचे डीसी केबल व आर्थिंग बंडल लंपास

0
14

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरालगत असलेल्या एका खासगी सौर ऊर्जा प्रकल्पावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकल्पातील महागडे डीसी केबल बंडल आणि आर्थिंग बंडल चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर शहरालगत गट क्रमांक ५८० मध्ये बबलूशेठ अग्रवाल यांचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. दरम्यान, ८ जुलै रोजी ते खासगी कामानिमित्त इंदूर येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत प्रकल्पात प्रवेश केला. चोरट्यांनी प्रकल्पातील सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीची १४ डीसी केबल बंडल तसेच ४४ हजार रुपये किमतीचे एक आर्थिंग बंडल चोरून नेले. अशा प्रकारे एकूण ६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर प्रकल्प मालकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

या प्रकरणी प्रकाशशेठ अग्रवाल यांनी रावेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. अलीकडच्या काळात सौर ऊर्जा प्रकल्पांमधील महागड्या केबल आणि विद्युत साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रकल्प चालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound