फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी उभ्या केलेल्या निराधार बालकांच्या सेवाकार्यात फैजपूरकरांनी पुन्हा एकदा मोलाचे योगदान दिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे उभारण्यात येत असलेल्या नव्या सात मजली आश्रम इमारतीच्या बांधकामासाठी फैजपूर येथील सहकारी संस्थांच्या वतीने एक लाख रुपये आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र इंगळे यांच्या वतीने २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. भविष्यातही या सामाजिक कार्यासाठी आर्थिक सहकार्य सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर निराधार, अनाथ आणि वंचित बालकांचे संगोपन करत हजारो मुलांना आईचे प्रेम दिले. त्यांच्या निधनानंतरही हा सेवाव्रताचा वारसा अखंड सुरू असून, संस्थेचा वाढता विस्तार लक्षात घेता शिरूर येथे सात मजली नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने समाजातील विविध स्तरांतून मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर फैजपूर शहरातील सातपुडा सहकारी पतसंस्था आणि लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच जितेंद्र इंगळे यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी प्रत्यक्ष शिरूर येथे जाऊन ही देणगी संस्थेकडे सुपूर्द केली. यावेळी नरेंद्र नारखेडे यांनी आश्रमातील बालकांशी संवाद साधला तसेच सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. आश्रम सेवक विनय सपकाळ यांनी नव्या इमारतीच्या बांधकामाची माहिती, निधीची आवश्यकता आणि प्रकल्पासमोरील विविध अडचणी याबाबत सविस्तर माहिती दिली. या चर्चेत सिव्हिल इंजिनिअर भरत महाजन, अतुल तलेले, संजोग होले, हरीश अत्तरदे, धवल तलेले, ममता ताई सपकाळ यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले.
नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले की, सिंधुताई सपकाळ यांचे बालपण आणि पूर्वायुष्य फैजपूर शहराशी जोडलेले असल्याने शहरवासीयांचा त्यांच्याशी भावनिक ऋणानुबंध आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला फैजपूरकरांनी नेहमीच उदारपणे मदतीचा हात दिला असून, पुढील काळातही हे सहकार्य कायम राहील. त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि उद्योगांनीही या आश्रमाच्या उभारणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शिरूर येथील आश्रमाचे बांधकाम लोकसहभागाच्या बळावर लवकर पूर्ण होईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमासाठी सातपुडा सहकारी पतसंस्था आणि लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने दिलेल्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



