Home Cities जळगाव जिल्हा परिषदेत ‘नवचेतना’ प्रशिक्षण; पूर्व प्राथमिक शिक्षणाला मिळणार नवी ऊर्जा

जिल्हा परिषदेत ‘नवचेतना’ प्रशिक्षण; पूर्व प्राथमिक शिक्षणाला मिळणार नवी ऊर्जा

0
14


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पूर्व प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण आणि बालककेंद्रित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवचेतना’ व ‘आधारशिला : मैत्री बालमनाशी’ या उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात विशेष एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. जिल्हाभरातील महिला व बाल विकास विभागातील अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी बालकांच्या संगोपन व सर्वांगीण विकासात महिलांबरोबरच पुरुषांचाही समान सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने बालकांच्या जडणघडणीत योगदान दिल्यास अशा उपक्रमांचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षणामध्ये जन्म ते तीन वर्षे वयोगटातील बालकांसाठी ‘नवचेतना’ आराखडा आणि तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘आधारशिला : मैत्री बालमनाशी’ या अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

प्रशिक्षणात पालक, अंगणवाडी, शाळा आणि स्थानिक समुदाय यांच्यातील समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. ‘माता गट’, ‘बालसखी’ आणि विविध मेळाव्यांच्या माध्यमातून अंगणवाडीतून शाळेत जाणाऱ्या बालकांना भावनिक आणि शैक्षणिक आधार कसा मिळेल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचा जन्मापासून शाळेत प्रवेश होईपर्यंतचा प्रवास सुरक्षित, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण करण्याचा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. नंदुरबार, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता त्याची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) हेमंतराव भदाणे यांनी पूर्व प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या आयुष्याचा भक्कम पाया असल्याचे सांगत अंगणवाडी स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले.

प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सोनाली पाटील आणि सुनंदा गावित यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले. या प्रशिक्षणामुळे अंगणवाडी स्तरावर बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Protected Content

Play sound