Home Cities धरणगाव धरणगाव तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरिणाला वनविभागाकडून जीवदान

धरणगाव तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरिणाला वनविभागाकडून जीवदान

0
13


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील नांदेड गावाजवळील शेत परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरिणाला वनविभागाने वेळेत मदत करत जीवदान दिले. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे जखमी हरिणावर वेळीच उपचार सुरू करण्यात आल्याने वन्यजीव संरक्षणाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.

नांदेड येथील शेत परिसरात एका हरिणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती स्थानिक नागरिक चांगो गोमा भील यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सरोज डी. पाटील यांना दिली. माहिती मिळताच डॉ. पाटील यांनी विलंब न करता वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर वनपाल सतीश जी. ठेलार आणि वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने जखमी हरिणाला सुरक्षितरित्या ताब्यात घेत प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी हरिणाला वनविभागाच्या उपचार केंद्रात हलविण्यात आले.

वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे जखमी हरिणाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याच्या जीविताचे रक्षण होऊ शकले. वन्यजीवांचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. या बचाव मोहिमेत वनपाल सतीश जी. ठेलार, सुनील थोराकर, वनरक्षक शांताराम पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच घटनेची माहिती देणारे चांगो गोमा भील आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. सरोज डी. पाटील यांच्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.


Protected Content

Play sound