Home उद्योग आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वेची घोषणा ; भाविकांना मोठा दिलासा

आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वेची घोषणा ; भाविकांना मोठा दिलासा

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने उधना–मिरज दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीमुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना पंढरपूरच्या दर्शनासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 09071 ही विशेष रेल्वे 23 जुलै आणि 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 6.45 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता मिरज येथे पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 09072 ही विशेष रेल्वे 24 जुलै आणि 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 8.40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.50 वाजता उधना येथे पोहोचणार आहे. या विशेष रेल्वेच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. या विशेष गाडीला चलथान, बारडोली, व्यारा, उकाई सोनगढ, नवापूर, खांडबारा, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, पाळधी, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी आणि पंढरपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह विविध भागातील वारकऱ्यांना आणि भाविकांना या विशेष रेल्वेचा लाभ घेता येणार आहे.

या विशेष रेल्वेची रचना 20 शयनयान (स्लीपर), 2 सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि 2 सामान-सह-गार्ड ब्रेकव्हॅन अशी ठेवण्यात आली आहे. भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन पुरेशी आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी RailOne अॅपचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी NTES अॅप किंवा भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळाचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound