Home प्रशासन यावलमध्ये स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट व बुरशीजन्य धान्य वितरणाचा आरोप 

यावलमध्ये स्वस्त धान्य दुकानांतून निकृष्ट व बुरशीजन्य धान्य वितरणाचा आरोप 

0
20


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना बुरशी लागलेले आणि अत्यंत निकृष्ट प्रतीचे गहू व तांदूळ वितरित केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत मिळणारे धान्य खाण्यायोग्य नसून त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यावल शहरासह तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना वितरित होणाऱ्या गहू व तांदळामध्ये बुरशी असल्याचे तसेच धान्याची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांना पोषणमूल्ययुक्त आणि दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा उद्देश असताना प्रत्यक्षात निकृष्ट धान्याचे वितरण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वितरित केलेले धान्य इतके निकृष्ट दर्जाचे आहे की ते खाण्यास योग्य नसून जनावरेही ते खाणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारचे धान्य नियमितपणे वितरित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित यंत्रणांनी वेळेत तपासणी न केल्यामुळे हा प्रकार वाढीस लागल्याची तक्रारही करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये धान्याची गुणवत्ता तपासणे, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही संबंधित विभागाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे निकृष्ट धान्याचा पुरवठा तातडीने थांबवून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी जिल्हा पुरवठा विभागाने तात्काळ दखल घेऊन संबंधित स्वस्त धान्य दुकानांमधील धान्याची गुणवत्ता तपासावी, बुरशीजन्य व निकृष्ट धान्याचे वितरण त्वरित बंद करावे आणि त्याऐवजी स्वच्छ, दर्जेदार व खाण्यायोग्य धान्य लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. गरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करून दोषींवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound