Home धर्म-समाज फैजपूरातील हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी

फैजपूरातील हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी

0
15


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपण्यासाठी तडवी वाड्यातील हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात नगरसेविका सुमय्या बी. शेख कुर्बान यांनी फैजपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदन सादर करून नगरपरिषदेमार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे शहरात या विषयाची चर्चा सुरू झाली असून, आगामी सर्वसाधारण सभेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या फैजपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील खंडेराव वाडी आणि सतपथी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, याबाबतचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेविका सुमय्या शेख यांनी हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याचाही या प्रस्तावामध्ये समावेश करून शासनाकडे शिफारस पाठविण्याची मागणी केली आहे. सादर करण्यात आलेल्या निवेदनात हजरत मरदान शाह वली बाबा दर्ग्याचे धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. फैजपूर शहरातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दर्ग्यावर दरवर्षी भव्य उर्स सोहळ्याचे आयोजन केले जाते. या उर्सासाठी जळगाव जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा दर्गा केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दर्ग्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास परिसराच्या विकासाला गती मिळेल, मूलभूत सुविधा वाढतील तसेच धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे शहराच्या धार्मिक वारशाचे जतन होण्याबरोबरच विविध समाजघटकांमध्ये ऐक्य आणि सौहार्दाची भावना अधिक दृढ होईल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. या मागणीमुळे फैजपूर शहरातील मुस्लिम समाजात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषदेने सकारात्मक भूमिका घेत शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर काय निर्णय घेतला जातो आणि दर्ग्याच्या समावेशाबाबत नगरपरिषद कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound