


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर ते चोपडा मार्गावर असलेल्या खदानीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील चोपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे अमळनेर शहरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरात राहणारे तिघे मित्र पोहण्यासाठी उड्डाण पुलाजवळील खदानींच्या परिसरातील पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेले होते. पोहत असताना ते खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.मानव बंटी रतनानी वय १४,कार्तिक विकी उधवानी वय १४ व दिनेश विजय पंजवानी वय १७ अशी मृतांची नावे आहेत.तिन्ही मुले अमळनेरच्या सिंधी कॉलनीमधील रहिवासी होती.
घटनेची माहिती मिळताच देवळी येथील व स्थानिक नागरिक आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी यु पाटील , शहर तलाठी अशपाक पिंजारी , पोलीस गणेश पाटील ,घटनास्थळी पोहचले.मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे याने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्याच्या काळात पाण्याने भरलेले खड्डे, तलाव तसेच इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.



