Home Cities जळगाव आधार कार्डाच्या कामांसाठी आता मुंबईची गरज नाही; जळगावमध्ये अत्याधुनिक सेवा केंद्र सुरू

आधार कार्डाच्या कामांसाठी आता मुंबईची गरज नाही; जळगावमध्ये अत्याधुनिक सेवा केंद्र सुरू

0
5


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  आधार कार्डाशी संबंधित तक्रारी, दुरुस्त्या आणि विविध सेवांसाठी मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून जळगाव शहरात अत्याधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, आता अनेक महत्त्वाच्या सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.

शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर, डी-मार्टजवळील मिश्री हाईट्स येथे नव्याने उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन UIDAI प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे उपमहासंचालक कॅप्टन लवकेश ठाकूर यांच्या हस्ते तहसीलदार शीतल राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी UIDAI प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक मंदार जेवरे, सेवा पुरवठादार संस्था ‘बीएलएस’चे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वी आधार कार्डाशी संबंधित तांत्रिक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी नागरिकांना मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा मोठा भार सहन करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत होती. राज्य शासनाच्या पुढाकारातून आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे केंद्र जळगावमध्ये सुरू झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.  या केंद्रात नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बायोमेट्रिक अद्ययावत करणे, लोकसंख्याशास्त्रीय दुरुस्ती, ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट तसेच जागेवरच तक्रार निवारण अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संपूर्ण केंद्र वातानुकूलित असून अत्याधुनिक संगणक प्रणाली, सुरक्षित नेटवर्क आणि आधुनिक डेटा प्रक्रिया सुविधा येथे कार्यरत आहेत.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हे केंद्र आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असून सार्वजनिक सुट्यांमध्येही आवश्यक सेवा नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर पद्धतीने आधारविषयक कामे पूर्ण करता येणार आहेत. सेवा प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी करून टोकन प्रणालीद्वारे नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. तसेच आधारच्या अधिकृत संकेतस्थळावरून आगाऊ वेळ निश्चित करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने गर्दी, गोंधळ आणि दीर्घ रांगा टाळता येणार आहेत. केंद्रात प्रशस्त प्रतीक्षागृह, आठ स्वतंत्र सेवा काऊंटर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्रामुळे जळगावसह जिल्ह्यातील नागरिकांना आधारविषयक सर्व सेवा अधिक जलद, सुलभ आणि दर्जेदार पद्धतीने मिळणार असून, मुंबईपर्यंतचा प्रवास, वेळ आणि खर्च वाचणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून डिजिटल सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Protected Content

Play sound