


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांदरम्यान झाडांच्या बुंध्यांभोवती करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याची गंभीर दखल महापौर दीपमाला काळे यांनी घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविलेल्या समर्पणपत्राद्वारे त्यांनी झाडांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रस्त्यांवरील पांढरे मार्गदर्शक पट्टे, झेब्रा क्रॉसिंग आणि लाईट रिफ्लेक्टरचे कामही त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापौरांनी पत्रात नमूद केले आहे की, शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू असताना अनेक ठिकाणी जुन्या व मोठ्या झाडांच्या बुंध्यांभोवती संपूर्ण काँक्रीट ओतण्यात आले आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना हवा व पाणी मिळत नसल्याने त्यांचे आयुष्य धोक्यात येत आहे. भविष्यात पावसाळा किंवा वादळी वाऱ्यामुळे अशी झाडे उन्मळून पडल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्यांभोवती जागा ठेवण्याऐवजी थेट काँक्रीट करण्यात आले असून, काही ठिकाणी बुंधे मोकळे करण्याचे काम अपूर्ण असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने झाडांच्या संरक्षणासाठी योग्य तांत्रिक उपाययोजना करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापौरांनी नव्याने तयार झालेल्या रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर अद्याप पांढरे मार्गदर्शक पट्टे, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक चिन्हे आणि रात्री वाहनचालकांना मार्गदर्शन करणारे लाईट रिफ्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
विशेषतः दूध फेडरेशन ते शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक ते अजिंठा चौफुली तसेच चित्रा चौक ते कोर्ट चौक या प्रमुख मार्गांवर वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने तेथे रस्ता सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करून आवश्यक कार्यवाही करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.



