


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि प्रभागांतील रखडलेल्या कामांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या संथ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत शहरातील अनेक भागांमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांवर खड्डे पडल्याचे तसेच अनेक रस्त्यांवर सीलकोट न केल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठेकेदारांना तातडीने नोटिसा बजावून समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देण्यात आले. ड्रेनेजच्या कामांमुळे खणलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने अशा ठिकाणी तातडीने मुरूम टाकून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही रस्ते व गटारांच्या कामांचे अंदाजपत्रक वेळेत तयार होत नसल्याबद्दल उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
डांबर खरेदीनंतर रस्ते दुरुस्तीची कामे मोजक्याच ठेकेदारांना देण्यात आल्याने कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची नाराजी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी व्यक्त केली. बैठकीला शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण विभाग प्रमुख प्रकाश पाटील, बांधकाम विभागाचे अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते. शहरातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.



