Home क्राईम ऑपरेशन शोध-४ : पोलिसांनी ३६ हरवलेल्या बालकांचा लावला शोध; ३२ मुले आणि...

ऑपरेशन शोध-४ : पोलिसांनी ३६ हरवलेल्या बालकांचा लावला शोध; ३२ मुले आणि ५ मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

0
16


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध-४’ मोहिमेत जळगाव जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. ८ जून ते २३ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान जळगाव पोलिसांनी एकूण ३६ हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यात यश मिळविले असून, त्यापैकी ३२ मुले आणि ५ मुलींना त्यांच्या आई-वडिलांच्या अथवा कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे अपर पोलिस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग यांच्या आदेशानुसार राज्यभर ‘ऑपरेशन शोध-४’ ही मोहीम राबविण्यात आली. जळगाव जिल्ह्यात ही मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे, उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पार पडली.

या मोहिमेत पोलिसांनी आश्रयगृहे, रेल्वे स्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने, बाजारपेठा तसेच रस्त्यावर भीक मागणारी किंवा काम करणारी मुले अशा विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली. हरवलेल्या बालकांचे फोटो, माहिती आणि नोंदी अद्ययावत करून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. तसेच ज्यांचे पालक अथवा नातेवाईक उपलब्ध नव्हते अशा बालकांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्याची कार्यवाहीही करण्यात आली.

जळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१८ ते जून २०२६ या कालावधीत जिल्ह्यात २,०२७ अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी १,९२८ (९५.११ टक्के) बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, केवळ ९९ (४.८८ टक्के) बालकांचा शोध अद्याप सुरू आहे. ही कामगिरी राज्यातील प्रभावी शोध मोहिमांपैकी एक मानली जात आहे.

याशिवाय बालमजुरी, बालगुन्हेगारी आणि मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत. जिल्ह्यातील हॉटेल, लॉज आणि इतर संशयित ठिकाणी नियमित तपासणी सुरू असून, सन २०२५ मध्ये १० आणि २०२६ मध्ये ५ ठिकाणी छापे टाकून एकूण ५१ पीडितांची सुटका करण्यात आल्याची माहितीही पोलिस प्रशासनाने दिली आहे.

 


Protected Content

Play sound