


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी दर्जेदार निवास व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल आणि चाळीसगाव येथे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. या वसतिगृहांच्या कार्यान्वयनासाठी संबंधित तालुक्यांतील आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक इमारत मालकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार एरंडोल, यावल आणि चाळीसगाव या तीन तालुक्यांमध्ये मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र अशी प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात येणारा खंड टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या वसतिगृहांसाठी सुमारे ९,२०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या, सर्व आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या तसेच शाळा, महाविद्यालये आणि शहराच्या मध्यवर्ती भागाजवळील इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता, निवास आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन इमारतींची निवड करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इमारत भाडेतत्त्वावर देण्यास इच्छुक असलेल्या मालकांनी शासनाने विहित केलेल्या नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयात सादर करावेत. प्रस्ताव सादर करताना शासनाने निर्धारित केलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना सुरक्षित निवास, नियमित शिक्षण आणि शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही वसतिगृहे महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.



