Home Cities जळगाव जळगावातील सावता माळी नगर, समर्थ नगर परिसरातील रस्ते चिखलमय ; नागरिकांचा संताप

जळगावातील सावता माळी नगर, समर्थ नगर परिसरातील रस्ते चिखलमय ; नागरिकांचा संताप

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगतच्या सावता माळी नगर, समर्थ नगर कॉलनी आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था ड्रेनेजच्या कामानंतर अत्यंत बिकट झाली असून पावसाळ्यात नागरिकांना अक्षरशः चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. रस्ते, ड्रेनेज आणि स्ट्रीट लाईट या मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून परिसरातील नागरिकांनी जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, सावता माळी नगर, समर्थ नगर कॉलनी तसेच गट क्रमांक ३०९, ब्लॉक क्रमांक ४ आणि परिसरातील रस्ते ड्रेनेज पाईप टाकण्याच्या कामासाठी पूर्णपणे खोदण्यात आले. या कामादरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात काळी माती पसरली असून संपूर्ण परिसर चिखलमय झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

विशेष म्हणजे, या भागातील अनेक रहिवाशांनी स्वतःच्या खर्चातून रस्ते तयार करून घेतले होते. मात्र ड्रेनेजच्या कामामुळे हे रस्तेही उद्ध्वस्त झाले. काम पूर्ण झाल्यानंतर अनेक दिवस उलटूनही रस्ते पूर्ववत करण्यासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच संबंधित लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी गुडघाभर चिखल साचत असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहने चिखलात अडकत असून दोन ज्येष्ठ नागरिक घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची माहितीही नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

रस्त्यांबरोबरच परिसरात स्ट्रीट लाईटचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रात्री संपूर्ण परिसर अंधारात असल्यामुळे अपघात, चोरी तसेच सुरक्षेच्या इतर घटनांचा धोका वाढला आहे. जळगाव शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात आजही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, सन २०१२ पासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढली असली तरी आजपर्यंत रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिकेकडे ड्रेनेजच्या कामामुळे खराब झालेले सर्व रस्ते तातडीने डांबरी किंवा काँक्रीट करण्याची, रस्त्यावरील चिखल व काळी माती हटविण्याची, आवश्यक त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट सुरू करण्याची तसेच दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound