


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । औषध व्यवसायातील बदलते तंत्रज्ञान, डिजिटल व्यवस्थापन आणि सक्षम पुरवठा साखळी या विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे केमिस्ट संघटनेची राज्यस्तरीय बैठक आणि ‘डिजिटलायझेशन ॲण्ड सप्लायचेन’ या विषयावरील विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली. जळगाव येथील केमिस्ट भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाला राज्यभरातील केमिस्ट संघटनांचे पदाधिकारी, औषध व्यावसायिक आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
रविवार, ५ जुलै २०२६ रोजी झालेल्या या बैठकीत औषध व्यवसायात तंत्रज्ञानाचा वाढता वापर, व्यवसायातील पारदर्शकता, पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच डिजिटल व्यवस्थापनाची गरज यावर सखोल चर्चा करण्यात आली. बदलत्या काळात औषध व्यवसाय अधिक परिणामकारक, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एआयओसीडी (AIOCD) आणि एमएससीडीए (MSCDA) चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे (आप्पासाहेब) उपस्थित होते. त्यांनी औषध वितरण व्यवस्थेमध्ये डिजिटलायझेशनची भूमिका, आधुनिक सप्लाय चेन व्यवस्थापन, औषधांच्या उपलब्धतेतील सुसूत्रता आणि भविष्यातील व्यवसायातील आव्हाने यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल प्रणालीमुळे औषध वितरण अधिक वेगवान, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी एमएससीडीएचे सचिव अनिलभाऊ नावंदर यांनीही उपस्थितांना संबोधित करत संघटनात्मक बळकटी, व्यावसायिक शिस्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर मार्गदर्शन केले. औषध व्यवसायातील बदलत्या नियमांनुसार डिजिटल पद्धती स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेचे (JDMDA) अध्यक्ष सुनील भंगाळे, सचिव अनिल झंवर यांच्यासह एमएससीडीएचे खजिनदार वैजनाथ जगुष्टे, उपाध्यक्ष मुकुंद दुबे, उपाध्यक्ष अरुण बरकसे आणि सहसचिव प्रताप धानवे यांच्यासह राज्यभरातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींनीही आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत डिजिटल व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. बैठकीत औषध व्यवसायातील आगामी बदल, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर, पुरवठा व्यवस्थेतील सुधारणा आणि संघटनात्मक समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. कार्यशाळेद्वारे उपस्थितांना आधुनिक व्यावसायिक पद्धतींची माहिती मिळाल्याने अशा उपक्रमांमुळे औषध व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला



