


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशी कॉलनी परिसरात एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती.
मृत तरुणाचे नाव मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे आहे. मुस्तकीम हा गेल्या सुमारे वीस दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक कामगार म्हणून कार्यरत होता. शनिवारी जोशीपेठ येथील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तकीम मंदिरात विद्युत वायर जोडण्याचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. त्यामुळे त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो उंचीवरून खाली कोसळला. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मुस्तकीमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. या हृदयद्रावक घटनेमुळे मासूमवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
मुस्तकीमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य असून त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील कमावत्या तरुणाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद झालेली नव्हती. विजेचा प्रवाह अचानक कसा सुरू झाला आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याबाबत पुढील चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.



