Home Cities जळगाव दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. समग्र शिक्षा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, सी.पी. व्हीलचेअर, डिजिटल श्रवणयंत्रे, टीएलएम किट, रोलॅटर, वॉकिंग स्टिक तसेच इतर आवश्यक सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय १५ मतिमंद विद्यार्थ्यांना विशेष एमआर किटचेही वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आत्मविश्वास हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा समाजाची अमूल्य संपत्ती असून त्यांना योग्य संधी, आधुनिक साधने आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दयेच्या नव्हे, तर समानता, सन्मान आणि विश्वासाच्या भावनेने पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांनी समन्वयाने कार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील उद्योग, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही दिव्यांगांच्या शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी केले. त्यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि शासनाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुशील पवार यांनी केले. कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माजी सभापती जनाआप्पा कोळी, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अल्लाउद्दीन बेलदार, विजय पवार यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound