Home प्रशासन कर्कीतील रस्त्यांची दुरवस्था कळसाला ; नागरिकांचा संताप

कर्कीतील रस्त्यांची दुरवस्था कळसाला ; नागरिकांचा संताप

0
19


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावातील मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्याने संपूर्ण मार्ग धोकादायक बनला असून वाहनचालकांसह शालेय विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गावात प्रवेश करताच मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्याचे स्वरूप अक्षरशः नदीसारखे झाले आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची भीती वाढली आहे. चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत असून नागरिकांचा प्रवास रोजच धोकादायक ठरत आहे. रस्ते विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे काही काळातच रस्त्यांची दुरवस्था झाली असून “रस्त्यांवर खर्च झालेला निधी नेमका कुठे गेला?”, “निकृष्ट कामांसाठी जबाबदार कोण?” आणि “दोषींवर कारवाई कधी होणार?” असे संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याबाबत अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन केवळ कागदोपत्री काम करत असून प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. पावसाळ्यात खड्डे पूर्णपणे पाण्याखाली जात असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कर्की गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार दुरुस्ती करावी, निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Protected Content

Play sound